Wednesday, June 22, 2016

मरतुकडी गाय

👍शेवटपर्यंत नक्की वाचा👉

🌹मरतुकडी गाय🐮

चिनमधले एक विद्वान गुरू आपल्या काही शिष्यांसकट प्रवासाला निघाले. त्यांना एक ओसाड प्रदेश लागला. त्या प्रदेशात पाण्याचे दुर्भीक्ष होते तर गवताचे एक पान पण दिसत नव्हते. त्या प्रदेशातील एका टेकडीवर त्यांना एक जिर्ण झालेली, मोडकळीला आलेली झोपडी दिसली. या अशा ओसाड प्रदेशात कोण रहात असावे या कुतुहलाने ते त्या झोपडीजवळ गेले. तेथे त्यांना एक मध्यमवयीन चिनी जोडपे, त्यांची तीन लहान मुले व एक मरतुकडी गाय दिसली. ‘तुमचे कसे भागते?’ गुरुंनी त्या चिनी माणसाला विचारले. त्याने त्या मरतुकड्या गाईकडे बोट दाखवले व म्हणाला, ‘ही गाय रोज आम्हाला थोडे थोडे दूध देते. यातील काही दूध आम्ही वापरतो. उरलेल्या दूधाचे दही करून त्याचे लोणी तयार करून जवळच्या गावात जाऊन विकतो. त्याचे जे काही थोडेफार पैसे मिळतात त्यातुन इतर गरजेच्या वस्तु आणतो. आमचे कसेतरी भागते.’

गुरु टेकडी उतरून खाली आले व आपल्या शिष्यांना म्हणाले, ‘ताबडतोब ती मरतुकडी गाय मारून टाका!’ गुरुंची ही आज्ञा ऐकून शिष्य चांगलेच गोंधळले. ज्या गाईवर त्या माणसाचे जिवन चालू आहे, त्या कुटुंबाला रोजी रोटी मिळते आहे ती गाय मारून टाकायची? शिष्यांना वाटले आपले गुरु किती निर्दय व निष्ठूर आहेत. कोणी शिष्य गाय मारायला तयार होईना. शेवटी हे काम गुरुंनी स्वतःच करायचे ठरवले. ‘बोला माझ्याबरोबर कोण येणार आहे?’ त्यांनी शिष्यांना विचारले. कसाबसा एक शिष्य तयार झाला. त्या रात्री गुरु त्या शिष्याला टेकडीवर घेऊन गेले, त्या मरतुकड्या गाईला टेकडीवरून खाली ढकलले व गाय मेल्याची खात्री करून घेऊन परत आले व आपल्या शिष्यांबरोबर पुढच्या प्रवासाला लागले.

त्यांच्या बरोबर जो शिष्य गेला होता त्याला फार ‘गिल्टी फिलिंग’ येऊ लागले. गुरुंनी जे केले ते पाप होते व त्या पापामध्ये आपण पण भागीदार होतो असे वाटून त्याच्या मनात शरमेची भावना निर्माण झाली. काही वर्षे त्याने ही भावना दाबून ठेवली पण एक दिवस या भावनेचा उद्रेक झाला. त्या कुटुंबाचे काय झाले हे पहाण्याची इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली. गुरुला न कळवताच तो त्या झोपडीच्या ठिकाणी आला.

तेथे आल्यावर त्या शिष्याला आश्चर्याचा धक्काच बसला. त्या क्षेत्राचा संपूर्णपणे कायापालट झाला होता. झोपडीच्या जागी एक आधूनीक, टोलेजंग बंगला उभा होता. बंगल्याच्या बाहेर अनेक आधुनीक मोटारी उभ्या होत्या. बंगल्याभोवती सुरेख बगीचा केला होता. सगळीकडे हिरवळ होती व काही शेते पण दिसत होती. शिष्याला वाटले आपण चुकीच्या ठिकाणी आलो. त्यांने तिथल्या एका माणसाला विचारले, ‘मा॑फ करा! मी कांही वर्षांपूर्वी येथे आलो होतो तेव्हा हा भाग ओसाड होता. वरती टेकडीवर एक झोपडी होती. आता त्या झोपडीतील माणसे कुठे असतात?’

‘तुमचे म्हणणे बरोबर आहे!’ त्या माणसाने उत्तर दिले. ‘त्या झोपडीतील माणसे इथेच म्हणजे त्या बंगल्यात रहातात. हा त्यांचा बंगला आहे. आज त्यांच्याकडे फंक्शन आहे.’

आश्चर्य वाटून तो शिष्य टेकडी चढून बंगल्यापाशी आला. त्याने पाहीले की तोच चिनी माणूस व त्याची बायको एका भव्य सोफ्यावर बसले आहेत व त्याची तीन तरूण मुले उत्साहाने सगळ्यांचे स्वागत करत आहेत. तो शिष्य त्या बंगल्यात गेला व त्या चिनी माणसाला म्हणाला, ‘काही वर्षांपूर्वी मी माझ्या गुरुंबरोबर येथे आलो होतो. त्यावेळी तुम्ही एका मोडक्या, जिर्ण झालेल्या झोपडीत तुमच्या तीन मुलांबरोबर रहात होतात. तुमच्याकडे एक हडकूळी गाय पण होती.’

‘अगदी बरोबर आहे.’ तो चिनी माणूस उत्तरला ‘एका रात्री आमची गाय टेकडीवरून खाली पडली व मेली. आमचा तर आधारच हरपला. जगायचे कसे हा प्रश्न उभा राहीला. कारण तोपर्यंत आम्हाला गायीच्या दुधावरच जगायची सवय होती. जगण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक होते. हळू हळू आमच्या असे लक्षात येऊ लागले की आमच्याकडे अनेक कौशल्ये आहेत जी आम्हाला ठाऊक नव्हती. आम्ही त्या कौशल्यांचा विकास करायला सुरवात केली, उद्योग व्यवसायात पदार्पण केले. हे तीन तरूण ही माझी मुले आहेत. तुम्ही याचे परिणाम बघताच आहात. जर आमची गाय मेली नसती तर हे घडले नसते!’

आता त्या शिष्याला कळले की गुरु गाय मारयला का सांगत होते. त्याला आपल्या गुरुंच्या दूरदृष्टीचे कौतुक वाटले व गुरुविषयींचा आदर कित्येक पटीने वाढला.

अनेक मराठी माणसांच्या आयुष्यात अशीच एक गाय असते ज्याला ‘नोकरी’ असे म्हणतात. मराठी माणसांची नजर या अशा गायीवरच असते. या गाइचे जे दूध मिळते (म्हणजे पगार मिळतो) त्यावर भागवण्याची सवय लागते. कोणाच्या नशीबात धष्टपुष्ट गाय येते तर कांहीना किरकोळ गाय मिळते तर काहींच्या नशीबात अशी गायच नसते.

मराठी माणसाचे सगळे कर्तृत्व त्याच्या नोकरीवर व नोकरीच्या प्रगतीवर ठरत असते. ज्याला उत्तम नोकरी मिळते तो जास्त कर्तृत्ववान, ज्याला बरी नोकरी मिळते तो कमी कर्तृत्ववान व ज्याला नेकरीच मिळत नाही त्याला ‘कंडेम’ समजण्यात येते. मराठी माणसाची प्रगती ही त्याच्या नोकरीच्या प्रगतीवर ठरत असते. ‘माझा नवरा क्लार्कचा मॅनेजर झाला’ हे एखाद्या गृहीनीचे वाक्य मोठ्या कौतुकाने सांगीतले जाते व ऐकले जाते. जणू काही नवरा क्लार्कचा मॅनेजर झाला म्हणजे त्याने फार मोठा पराक्रम केला असा थाट या वाक्याभोवती असतो. पण किती झाले तरी ‘नोकरी’ ही एक मरतुकडी गायच असते, कारण ही गाय पुरेसे दूध कधीच देत नसते.

अशीच अजुन एक गाय असते ज्याला ‘जर्सी’ गाय म्हणतात. ही गाय भरपूर दूध देत असते पण ही गाय नेकरीवाल्यांच्या नशीबी नसते तर फक्त ‘उद्योग, धंदा, व्यवसाय’ करणार्याह माणसांच्या नशीबी असते. पण मराठी समाजात या गाईला कोणी फारसे महत्व देत नसते. ‘माझ्या नवर्याेचा धंदा एका लाखाचा एक कोटी रुपये झाला.’ हे एखाद्या गृहीणीचे वाक्य फारशा कौतुकाने बोलले पण जात नाही व ऐकले पण जात नाही. ‘माझे वडील बँकेत मॅनेजर आहेत.’ हे वाक्य ज्या अभीमानाने मुलाकडून सांगीतले जाते त्याच अभीमानाने ‘माझ्या वडिलांचे स्टेशनरीचे दुकान आहे’ हे वाक्य सांगीतले जात नाही. लग्न करणार्याा मराठी मुलींना तर फक्त नोकरी करणारीच मुले हवी असतात. मामलेदार कचेरीत शिपायाची किंवा पट्टेवाल्याची नोकरी करणाऱ्या मुलाला हुंड्यासकट मुलगी मिळते. पण वर्षाला 50 लाख रुपये इन्कम असलेल्या पण धंदा करणार्याा मराठी मुलाला लग्नासाठी मुलगी मिळणे कठीण जाते.

‘नोकरी’ च्या मरतुकड्या गाईवर जगायचे का उद्योग व्यवसायाच्या क्षेत्रात शिरून भरपूर दूध देणारी जर्सी गाय मिळवायची का दोन्ही गायी संभाळायच्या हे ज्याचे त्याने ठरवायचे नाही कां?

तुम्हाला काय वाटते?